मृत मजुराच्या नातेवाईकांना कारखान्याकडून १८ लाखाची भरपाई
बेळगाव, ता. ९ : तालुक्यातील नावगे क्रॉस जवळील स्नेहम इंटरनॅशनल कारखान्यात लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगाराच्या कुटुंबीयांना कारखाना १८ लाख रुपयांची भरपाई देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
आगीत मृत्युमुखी पडलेल्या यल्लाप्पा गोंड्यागोळ याच्या वडिलांच्या आणि आईच्या नावे कारखान्याने प्रत्येकी नऊ लाख रुपयांचा धनादेश जारी केला असून त्या मजुराच्या कुटुंबीयांना उद्या धनादेश देण्यात येणार असल्याचे कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मंगळवारी (ता.६) स्नेहम इंटरनॅशनल या चिकटपट्टी टेप तयार करणाऱ्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण कारखाना बेचिराख झाला. या आगीमध्ये यल्लाप्पा गोंड्यागोळ या कामगाराचा मृत्यू झाला होता. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी देखील या जळलेल्या कारखान्याची पाहणी केली होती दरम्यान अनेक संघटनांकडून मयत युवकाच्या वारसांना शासनाकडून मदत देण्याची मागणी होऊ लागली होती.
या आगीत कारखान्याचे कोट्यावधींचे नुकसान झाले असले तरी कारखान्याच्या मालकाने कामगारांचा एक महिन्याचा पगार दिला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या