शौचालयाच्या भिंतीवर महिलेचा मोबाईल नंबर,हा लैंगिक छळ
बंगळुरू, ता. २१ : पुरूषांच्या शौचालयातील भिंतीवर विवाहित महिलेचा मोबाईल नंबर लिहून कॉल गर्ल लिहिणे हा लैंगिक छळ आहे, अशी महत्वाची टिपण्णी कर्नाटकच्या हायकोर्टाने केली आहे. कर्नाटकातील एका महिलेसोबत असाच प्रकार घडला होता. याप्रकरणावर सुनावणी करताना हायकोर्टाने ही महत्वपूर्ण टिपण्णी केली आहे.
कर्नाटकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या महिलेने सरकारी कामासाठी आपला मोबाईल नंबर त्याच ठिकाणी काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला दिला होता. पण अचानक या महिलेला वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून कधीही फोन येऊ लागले. यामधील काहींनी या महिलेसोबत आक्षेपार्ह भाषेमध्ये बोलण्यास सुरूवात केली. तर काहिंनी शिवीगाळ केला आणि धमकी देखील दिली. त्यामुळे ही महिला प्रचंड घाबरली.
याप्रकरणी महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. बंगळुरूमधील पुरूषांच्या शौचालयातील भिंतीवर या महिलेचा मोबाईल नंबर कॉल गर्ल म्हणून लिहिला होता. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ३८ वर्षीय अल्ला बक्ष पटेलविरोधात गुन्हा दाखल केला. पटेलने असे का केले याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. अल्ला बक्ष पटेलने आरोपपत्र रद्द करण्यासाठी कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने त्याची याचिका फेटाळून लावली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या