याच्यासारखा नालायक माणूस नाही, अजित पवारांवर सख्या भावाची टीका
पुणे, ता. १९ : राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर आता पवार कुटुंबियांमध्येही संघर्ष पाहायला मिळत आहे. बारामती लोकसभा निवडणुकीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात चांगली जुंपली आहे.अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनीही अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. नालायक माणूस असा उल्लेख करत श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
"दादांच्या विरोधात कसा काय आलो याचं आश्चर्य वाटलं असेल. दादांच्या चांगल्या आणि वाईट काळात मी त्यांच्यासोबत होतो. त्यांनी जे निर्णय घेतले त्यात मी साथ दिली. भाऊ म्हणून त्यांनी सांगितले तिथे उडी मारली. कधी काही विचारलं नाही. पण आमची जेव्हा चर्चा झाली तेव्हा माझं म्हणणं होतं की आमदारकीला तू आहेत तर खासदारकी साहेबांकडे दिली पाहिजे. कारण साहेबांचे आमच्यावर उपकार आहेत. साहेबांची वय आता 83 झाल्यामुळे या वयात त्यांना सोडणे मला पटले नाही. वयस्कर झालेल्या माणसाची आपण किंमत करत नाही हा विचारच मला वेदना देऊन गेला. कारण पुढची 10 वर्षे दुसऱ्या व्यक्तीकडून लाभ मिळणार आहे. याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे," असे श्रीनिवास पवार म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या