मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याची मागणी
बेळगाव, ता. २७ : मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे एका ठरावाद्वारे करण्यात आली. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे प्रयत्न करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
पत्रकार संघातर्फे मंगळवारी मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ही मागणी करण्यात आली.
प्रारंभी कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य सदानंद सामंत यांच्या हस्ते वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यातरख आले.
यावेळी बोलताना संघाचे माजी अध्यक्ष कृष्णा शहापूरकर म्हणाले, मराठी भाषेला वैभवशाली परंपरा आहे. देशात हिंदी, बंगाली, तेलगू नंतर सर्वाधिक बोलली जाणारी चौथ्या क्रमांकाची भाषा आहे. तर एका सर्वेक्षणानसार जगात तिचा १९ वा क्रमांक आहे. पण या महत्वपूर्ण भाषेची आजची अवस्था दयनीय आहे. तिचा टक्का कमी होत चालला आहे. सीमा भागात कर्नाटक सरकारकडून मराठीचे उच्चाटन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपल्यासमोर हे मोठे आव्हान आहे. याकरिता मराठी भाषा टिकवण्यासाठी आणि तिला वैभव मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
पत्रकार व कवी शिवाजी शिंदे यांनी मराठी भाषेची होणारी गळचेपी थांबविण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
कार्यवाह शेखर पाटील यांनी आभार मानले. पत्रकार भवनात झालेल्या या कार्यक्रमास डी. के. पाटील, उपाध्यक्ष महेश काशीद, परशराम पालकर, विकास कलघटगी, मधु पाटील, सुहास हुद्दार, अब्दुल पाच्छापुरे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या