खानापुरात शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन
खानापूर, ता. १६ : येथील शिव -स्वराज जनकल्याण फाउंडेशनच्या उद्घाटना निमित्त फाउंडेशनतर्फे लोकमान्य भवन येथे १७ ते १९ नोव्हेंबर पर्यंत शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे प्रदर्शनाबाबत तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली असुन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसह इतर मान्यवर मंडळींच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी इतिहास रचला पण इतिहास निर्माण करताना असंख्य किल्ले जिंकून स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्याची निर्मिती करताना मावळे तयार केले. स्वतःचे आरमार, सैन्य बळ तसेच शस्त्रास्त्रसाठा जमा केला शिवाजी महाराजांनी अनेक लढाया केल्या याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना व सर्वांना दिली जाते. पोवाडे, चित्रकला, चित्रफीत गडकिल्ल्यांचे दर्शन या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगितली जाते. परंतु स्वराज निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी कोणत्या शस्त्रांचा वापर केला याची माहिती अनेकांना पूर्णपणे माहीत नाही यामुळे याची माहिती आजच्या पिढीला व शालेय विद्यार्थ्यांना देण्यासाठी शिव स्वराज्य जणकल्याण फाउंडेशनतर्फे दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई यांच्या सहकार्याने लोकमान्य भवन खानापूर येथे भव्य शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे तसेच शस्त्र प्रदर्शन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पहावे यासाठी तालुक्यातील विविध शाळांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात आली असून अनेक गावांमध्ये पत्रके वाटण्यात आली आहेत. त्यामुळे प्रदर्शनाला नागरिकांची मोठी गर्दी होईल असा विश्वास व्यक्त होत असून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांच्यासह इतर मान्यवर उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत.
लोकमान्य भवन येथे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रदर्शन खुले राहणार असून शस्त्रांसह विविध गड किल्ल्यांच्या छायाचित्र प्रदर्शन देखील भरवण्यात आले आहे. याचा नागरिकांनीया लाभ घ्यावा असे फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी केले आहे.
-------------------------
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या