Type Here to Get Search Results !

शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू

 

शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू



बेळगाव : आपल्या घरी  खिडकीला टांगलेली दोरी गळ्यात घालून खेळताना फास लागून एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना, एपीएमसी रस्त्यावर मार्कंडेयनगर येथे शुक्रवारी दुपारी घडली आहे. ऐन दिवाळीत शाळकरी मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. आदित्य बसाप्पा नागराळ (वय 10) रा. मार्कंडेयनगर असे त्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. तो एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत चौथीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.



आदित्यचे वडील कामानिमित्त हैदराबादला गेले आहेत. आई‌ व इतर कुटुंबीय दिवाळीनिमित्त, घरात साफसफाई करीत असताना, खिडकीला टांगलेली एक नॉयलॉन दोरी गळ्यात अडकवून तो खेळत होता. खेळता खेळता त्याच्या गळ्याला फास लागला. त्याचा आवाज ऐकून आई खिडकीकडे धावली. दोरी कापून त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. एपीएमसी पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या