Type Here to Get Search Results !

सामान्य सीमावासीयांच्या भावना...

 

सामान्य सीमावासीयांच्या भावना.....




चला पुन्हा एक वर्ष उलटले, चंद्राला लागणारे ग्रहण अधिक गडद व्हावे तसा प्रत्येक वर्षी येणारा काळा दिवस सीमाभागातील मराठी माणसाच्या आयुष्यात गडद अंधार करीत असतो, आणि इथला मराठी माणूस फक्त टक लावून बसला आहे कधी एकदा ग्रहण सुटेल आणि कधी एकदा हे अन्यायाचे, गुलामगिरीचे पाश तोडीत आपल्या हक्काच्या महाराष्ट्र राज्यात आम्ही सामील होऊ.

      पण हे जर तेव्हाच घडले असते तर आज हे दुय्यम नागरिकत्व जगण्याची वेळ सीमावासीयांच्यावर आली नसती, तेव्हा सुद्धा राजकीय इच्छाशक्ती कमी पडली आणि आजही त्याच इच्छाशक्तीची कमतरता महाराष्ट्राच्या राजकारण्यामध्ये दिसून येते.




मुंबई, बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून सुरू झालेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा जेव्हा फक्त मुंबई मिळताच बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा पक्षेत्तर असलेल्या संयुक्त महाराष्ट्रवादी नेत्यांनी त्याला विरोध दर्शविला होता, त्यात आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, भाई चितळे, माधवराव बागल होते, सीमावाद आणि संयुक्त महाराष्ट्र लढा अशी तफावत न करता पूर्वीच्या मागणीवर आपण सर्वजण ठाम राहून बेळगावसह सीमाभाग घेऊनच संयुक्त महाराष्ट्र स्थापन करू अशी या मंडळींची मागणी होती, पण संयुक्त महाराष्ट्र समितीतील सर्वच राजकीय पक्षांना समितीतून बाहेर पडून आपलं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्याचे जणू डोहाळे लागले होते, त्यामुळे हातातून डांग,उंबरगाव गेले ते गुजरातला दिले, बेळगाव कारवार, बिदर भालकीसह ८६५ गावांचा प्रदेश म्हैसूर राज्यात राहिला. सर्वानी द्विभाषिक राज्य लयाला जात मुंबई राजधानी असलेले महाराष्ट्र राज्य मिळाले म्हणून आपल्या तलवारी लढाई संपण्याच्या पूर्वीच म्यान केल्या. जर मुंबई सोबत बेळगाव पण घेऊनच जाऊ ही मागणी तेव्हाच्या महाराष्ट्राच्या राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी लावून धरली असती तर आज हा दिवस काळा दिवस म्हणून सीमावासीयांच्या आयुष्यात आला असता काय?

     तेव्हा महाराष्ट्र लढाईत जिंकला आणि तहात हरला असेच म्हणावे लागेल. आतातर सीमाप्रश्नाबाबत जिव्हाळा फक्त सीमावासीयांच्या तोंडाला पाने पुसण्या इतपत शिल्लक आहे हे प्रकर्षाने जाणवत असते.

  गेली १९ वर्षे सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्न रेंगाळत आहे, त्यामुळे सर्वांच्या सोयीचं उत्तर झालंय 'प्रश्न न्यायालयात आहे जास्त बोलू शकत नाही' , आणि इथे न बोलता सगळं अस्तित्व संपवण्यात आलं त्याकडे कोणीच पहात नाही, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे रूपांतर कधी सीमावासीयांच्या लढ्यात झालं हे कळलंच नाही, आम्ही मात्र अजूनही माझं राज्य माझी मातृभूमी माझा महाराष्ट्र म्हणून आस लावून बसलो आहोत फक्त महाराष्ट्र राज्यात सामील होण्यासाठी "गेली ६८वर्षे"....!

😔😔😔😔😔

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या