Type Here to Get Search Results !

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

शिवसैनिकांना टोलनाक्याजवळ रोखले

बेळगाव, ता. १ : बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक 1 नोव्हेंबर काळा दिनी निषेध व्यक्त करून हरताळ पाळतात. यावेळी महाराष्ट्रातील नेतेमंडळी, कार्यकर्ते पाठिंबा देण्यासाठी बेळगावला जातात. या सर्व नेत्यांना कर्नाटक शासनाने कर्नाटक प्रवेश बंदी केली आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांतर्फे बेळगावला आज आयोजित काळा दिन फेरीत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या कोल्हापूरातील शिवसेना नेते विजय देवणे आणि कार्यकर्ते यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कोगनोळी टोल नाक्याजवळ रोखण्यात आले. यावेळी पोलीस व शिवसेना पदाधिकारी यांच्यामध्ये बाचाबाची झाली.



पोलिसांनी रोखून धरल्याच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन करण्यात आले. बेळगावसह सीमाभागामध्ये मराठी भाषेवर अन्याय झाल्यानंतर त्याची ठिणगी शेजारी महाराष्ट्र राज्यात उमटते. खासकरून कोल्हापूर येथे या विरोधात निदर्शने केली जातात. आज काळादिन फेरीत सहभागी होण्यासाठी शेकडो कार्यकर्ते येण्याची शक्यता होती. त्यासाठी कर्नाटक पोलिसांनी चेक पोस्ट उभारले आहेत. कोगनोळी टोलनाकामार्गे आत येताना पोलिसांनी अडविले आणि ताब्यात घेऊन महाराष्ट्र पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. यावेळी कर्नाटक राज्यामध्ये जाऊ दिले जात नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे या ठिकाणी काहीकाळ तणावपूर्ण वातावरण बनले होते.


यावेळी 'रहेंगे तो महाराष्ट्र में, नही तो जेल में, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीचा संयुक्त महाराज झालाच पाहिजे, कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा निषेध स्वरूपाच्या घोषणा, या संदर्भात देऊन लक्ष वेधून घेतले. काळादिनाच्या पार्श्वभूमीवर कोगनोळीत पोलिस बंदोबस्त वाढविला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून विविध सूचना केल्या. राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी दूधगंगा नदीवर कर्नाटक पोलिसांनी बॅरिकेटस लावून बंदोबस्त ठेवला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या चारचाकी वाहनधारकांची चौकशी करूनच प्रवेश दिला जात आहे... अतिरिक्त पोलिस अधीक्षक वेणुगोपाल यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सूचना केल्या आहेत. यावेळी चिक्कोडी डीवायएसपी जी. बी. गौडर, निपाणीचे मंडळ पोलिस निरीक्षक बी. एस. तळवार, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी, उपनिरीक्षक डी. बी. कोतवाल, सहाय्यक उपनिरीक्षक एस. ए. टोलगी, एम. एस. सूर्यवंशी यांच्यासह पोलिस उपस्थित होते.

--------------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या