महापालिकेच्या राजकारणाला जातीचे ग्रहण
बेळगाव, ता. २८ : महापालिकेच्या राजकारणात आता जातीच्या राजकारणाने शिरकाव केला आहे. महापालिका बरखास्ती, बुडाची चौकशी यामागे मराठा समाजाला टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप भाजप नेते संजय बेळगावकर आणि धनंजय जाधव यांनी केला आहे. तर मराठा समाजावर अन्याय होत असताना कुठे होता, असा सवाल म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी केला आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनीही भाजपनेच मराठा समाजावर अन्याय केला आहे, असा आरोप केला आहे
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आयुक्तांविरोधात केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे तक्रार केल्यास महापालिका बरखास्तीची शिफारस करू, असे सांगितले आहे. बुडा, स्मार्ट सिटी, खाऊ कट्टा, जय किसान भाजी मार्केटमध्येही भ्रष्टाचार झाला आहे. त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यावरुन आता राजकारणाने वेग घेतला आहे. बुडा अध्यक्षपदी (संजय बेळगावकर) आणि महापौर (महापौर शोभा सोमनाचे) मराठा असल्यामुळे पालकमंत्री चौकशी लावून अन्याय करत असल्याचा आरोप करण्यात आला. त्याला विरोधी गटातूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
बुडाचे माजी अध्यक्ष संजय बेळगावकर यांनी पालकमंत्री जारकीहोळी यांचा निषेध केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्यांच्या व्हिडीओत, पालकमंत्री जारकीहोळी हे सध्या महापालिकेच्या बरखास्तीबद्दल बोलत आहेत. बुडामधील भ्रष्टाचारासंदर्भातही आरोप करीत आहेत. बुडाच्या कारभाराची चौकशी करण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. मात्र, मी मराठा समाजाचा असल्यामुळे त्यांनी हा प्रकार सुरू केला आहे. तसेच महापौर शोभा सोमनाचे यादेखील मराठा समाजाच्या असल्यामुळे त्यांनी बरखास्तीचे वक्तव्य केले आहे. या प्रकाराचा मी निषेध करीत आहे. मराठा समाजाने याचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांचाही अशाच प्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
भाजपाच्या संजय बेळगावकर यांच्या विधानावर म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी आक्षेप घेतला आहे. शहर परिसरात मराठी भाषिकांवर सातत्याने अन्याय होत आहे. मराठी भाषिक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावल्या जात आहेत. मराठी भाषिक कार्यकर्त्यांवर खोटे खटले दाखल होत आहेत. या विरोधात मराठी भाषिक सातत्याने आंदोलन करत आहेत. मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाप्रसंगी बेळगावकर कुठे होते? ते बुडा अध्यक्ष असताना शिवसृष्टीतील कामाला वेग आला. मात्र, याच शिवसृष्टीच्या उद्घाटन कार्यक्रमाला त्यांनाच आमंत्रण देण्यात आले नाही. बेळगावकरांना महापौरांचा कळवळा येतो. मात्र 138 सफाई कामगारांवर झालेल्या अन्यायावर बोलत नाहीत, असा टोला रमाकांत कोंडुसकर यांनी लगावला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या