राजांच्या जाण्याने साहित्य क्षेत्राची हानी..
कोल्हापूर : कथा, कविता, चित्रपट, नाटक, पथनाट्य, समीक्षा, संशोधनपर लेखन आदी क्षेत्रांत आपली छाप उमटवणारे साहित्यिक-कार्यकर्ते प्रा. राजा शिरगुप्पे यांचे आज कोल्हापुरात निधन झाले. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. कामगार चळवळ ते समाजकारण ते साहित्यिक असा त्याचा प्रवास राहिला असून त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात मोठी हानी झाली आहे. त्यांनी विविध सामाजिक चळवळीत काम केलं.
राजा शिरगुप्पे हे निपाणी येथील कामगार चळवळीतून ते समाजकारणात सक्रिय झाले होते. लेखणी ही समाज व्यवस्था बदलासाठी असते या विचाराने त्यांनी आयुष्यभर लेखन केले. बिहार च्या राजकारणावर त्यांचा दांडगा अभ्यास होता. ते विद्रोही सांस्कृतिक चळवळीसह प्रगतशील अशा नानाविध चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. सांगली येथे २०१० साली झालेल्या १० व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या भटकंतीवर आधारित लेखनामुळे साप्ताहिक साधनाचे लेखक अशीही त्यांची ओळख निर्माण झाली होती. ते एक चांगले लेखक असून त्यांची अनेक पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. त्यांची काही पुस्तके विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठीही निवडली गेली. काही पुस्तकांच्या हिंदी भाषेतील आवृत्याही प्रकाशित झाल्या.
न पेटलेले दिवे, तिच्या नवऱ्याचे वैकुंठगमन यासह विविध पुस्तकांचं लेखन देखील त्यांनी केलं. लहान मुलांसाठीही त्यांनी लेखन केले. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभर त्यांचा मित्रपरिवार आहे. गोष्टीवेल्हाळ स्वभावामुळे अबालवृद्धांशी त्यांचे मैत्रीचे भावबंध जुळायचे. त्यांच्या निधनामुळे चळवळीची मोठी हानी झाली असून त्यांच्या मागे पत्नी प्रा. मीना शिरगुप्पे, चित्रकार मुलगा रोहन, मुलगी अनुजा, सून असा परिवार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या